क्रीडा विकासासाठी शासनाकडून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देणार

 

राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील असं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेवून राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. शासनानं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करीत आहोत. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात 155 क्रीडा संकुल असून त्यात आणखी 122 संकुलांची भर घालण्यात येणर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडुंच्या बक्षीसाच्या रकमेत पाच पट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात तालुका, जिल्हा, आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन होत असते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी हे टप्पे महत्वाचे आहेत. म्हणून खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवली तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी. इंटरनेट-मोबाईलच्या जगात मैदानावर खेळणे अत्यंत आवश्यक आहे. खेळल्यानं शरीर आणि मन कणखर होईल आणि आव्हाने पेलण्याची ताकद मिळेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: