दोन महिन्यांच्या बाळाला वाचवणाऱया जिगरबाज साक्षीला मनपा स्वखर्चाने नवा पाय बसवणार !

 

पोलादपूरच्या केवनाळे येथे झालेल्या दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन महिन्यांच्या बाळाला वाचवणाऱया साक्षी दाभेकर हिला नवा पाय बसवला जाणार आहे. या दुर्घटनेत १४ वर्षांच्या साक्षीच्या पायावर भिंत कोसळल्याने तिचा एक पाय निकामी झाला आहे. साक्षीवर सध्या पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर तसेच आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी साक्षीची भेट घेऊन धीर दिला. यावेळी महापौर पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी रोख एक लाख तर नगरसेवक अनिल कोकीळ यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश साक्षीकडे सुपूर्द केला. पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेल्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्यांच्या बाळाला वाचवताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळून एक पाय निकामी झाला होता.

यावर बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की, ज्याप्रमाणे हिमतीने तू बाळाला वाचवले आहेस तीच हिंमत आताही कायम ठेव . तुझ्यावर केईएम रुग्णालय संपूर्णपणे मोफत उपचार करणार असून प्रारंभी जयपूर फूट व त्यानंतर बारा लाख रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कं पनीचे सारबो रबर पाय मोफत बसविण्यात येणार आहेत . तू पूर्वीप्रमाणेच धावण्याच्या शर्यतीत सहभागी होऊ शकणार असे महापौर पेडणेकर यांनी साक्षीला सांगितले.

Team Global News Marathi: