कोरोना नियमांचे पालन करून स्वतंत्र दिन साजरा करण्याचे राज्य सरकारचे आदेश !

 

मुंबई | स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार असून कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने ४ जून २०२१ आदेश पारित केले आहेत. मागच्या वर्षीप्रमाणेयावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

हा कार्यक्रम साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा.

Team Global News Marathi: