कोरोना लसीकरण राज्याच्या तिजोरीवर पडणार भार, काँग्रेसने घेतला हा निर्णय !

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. तर दुसरकीकडे लसीकरण मोहिमेला सुद्धा युद्ध पातळीवर राज्यात सुरवात झालेली आहे. त्यातच येणाऱ्या १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सुद्धा लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सर्व नागरीकांना मोफत लस देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार त्यांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘मोफत लसीकरण व्हावं ही पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भूमिका आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.

मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल. तो कमी व्हावा या हेतूनं राज्यातील काँग्रेसचे आमदार त्यांचं १ महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देतील, असे थोरात पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात त्यांचं एका वर्षाचं संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिली जाणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

Team Global News Marathi: