काँग्रेसचा भर केवळ राज्य लुटण्यावर, पुन्हा नरेंद्र मोदी यांनी साधला निशाना

 

मणिपूर | मणिपूर विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, आता दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूरच्या मतदारांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा लगावला. काँग्रेसचा भर हा केवळ राज्य लुटण्यावर असल्याचा आरोप यावेळी मोदींनी केला.

काँग्रेस राज्याची लूट करण्यात इतकी गुंतली आहे, की त्यांना लोकांसाठी काम करायला वेळ नाही. मणिपूरच्या जनतेत राहून विकासकामे करण्यावर भाजप नेत्यांचा भर असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस पक्षाने मणिपूरच्या विकासासाठी काम केले नाही. त्यांनी फुटीरतावादाला प्रोत्साहन दिले. मणिपूरच्या जनतेने याची जाणीव ठेवली पाहिजे. भाजप ईशान्येकडील विशेषतः मणिपूरच्या विकासासाठी काम करत आहे. काँग्रेसची फूट पाडा आणि राज्य करा ही योजना भाजप उद्ध्वस्त करेल असेही मोदी यावेळी म्हणाले.

आम्ही मणिपूरमध्ये एम्स बांधण्याची योजना आखत आहोत. हीच वेळ स्वावलंबी भारताची आहे. हे दशक विकास आणि प्रगतीचे दशक आहे. आज मणिपूर वेगाने वाटचाल करत आहे. मणिपूरमध्ये क्रिडा विकासासाठी आम्ही राज्यात क्रीडा विद्यापीठही उभारणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मणिपूरची ओळख आता कौशल्य, स्टार्टअप आणि खेळ यातून होत आहे. भविष्यात आमचे सरकार 100 कोटी रुपयांचा स्टार्ट-अप फंड तयार करण्यास तयार असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले.

Team Global News Marathi: