काँग्रेसच्या आणखी एका नेत्याचा ‘लेटर बॉम्ब’, ठाकरे सरकार येणार अडचणीत ?

 

नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडालेली असतानाच काँग्रेसमधूनही आक्रमकपणे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काँग्रेसच्या नाराज २५ आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली असतानाच आता आणखी एका काँग्रेस नेत्याने पत्र लिहून महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत खदखद व्यक्त केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत काँग्रेसने सावध भूमिका घ्यायला हवी, असं मत मांडले आहे.

‘महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात असून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. मात्र राज्य सरकारमध्ये या दोन पक्षांच्या सोबत असल्याने काँग्रेसची प्रतिमादेखील मलीन होत आहे असं विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसचं नुकसान होत असून बदनामीचा सामना करावा लागत आहे.

विश्वबंधू राय यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधत म्हटलं आहे की, ‘महाविकास आघाडीची स्थापना किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. मात्र मागील अडीच वर्षांमध्ये काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये काँग्रेस कोणत्या आधारावर जनतेकडे मतं मागणार? अशी चिंता आपल्या आमदारांना सतावत आहे,’ अशा शब्दांत राय यांनी महाराष्ट्रातील स्थितीबाबत भाष्य केलं आहे.

Team Global News Marathi: