येत्या २८ डिसेंबरला राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात सभा घेणार

 

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी डिंसेबर महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे येत्या २८ डिसेंबरला काँग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.

काँग्रेसची शिवाजी पार्कवर होणारी ही पहिली सभा नसली तरी पण राहुल गांधींची ही पहिलीच सभा आहे. यापूर्वी २००३ आणि २००६ मध्ये काँग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये राहुल गांधींकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली. पण ती नाकारण्यात आली होती. मोजक्या १६ दिवसांसाठीच शिवाजी पार्कवर कार्यक्रम घेता येतो. या व्यतिरिक्त वर्षातील जास्तीत जास्त ४० दिवस शिवाजी पार्कवर कार्यक्रम घेतले जातात. पण, नगरविकास विभागाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. काँग्रेसच्या येत्या सभेची परवानगीही नगरविकास विभागाकडून घ्यावी लागेल.

राज्यात काँग्रेस आणि सेनेची आघाडी असली तरी महापालिकेत बिघाडी आहे. पण, संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीनंतरची काँग्रेस-सेनेची वाढती जवळीक ही भाजपसोबतच राष्ट्रवादीचीही डोकेदुखी ठरेल. शिवतीर्थ या नावाने ओळखल्या जाणा-या या मैदानावर हिंदुत्वाच्या गर्जनाही घुमल्या आणि कॉमन मिनीमम प्रोग्रामवर आधारलेला शपथविधीही पार पडला. आता हेच मैदान काँग्रेससाठी नवसंजीवनीचे काम करणार आहे.

Team Global News Marathi: