कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेवर कोसळला दुःखाचा डोंगर! २४ तासात कोरोनाने हिरावल्या ‘दोन’ जवळच्या व्यक्ती

मुंबई । कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. अशातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कित्येकांना आपले जीव तर अनेकांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली आहेत. असाच काहीसा प्रसंग मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेच्या बाबतीत घडला आहे.

या कोरोना काळात श्रेया बुगडेने आपल्या जवळच्या दोन व्यक्तींना गमावले आहे. त्या दोन व्यक्ती म्हणजे श्रेयाच्या दोन लाडक्या मावशी. या दोन्ही मावशींचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अगदी २४ तासांत दोन्ही मावशींनी जगाचा निरोप घेतल्याने श्रेयाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, अभिनेता स्वप्नील जोशीने कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी स्वप्नीले श्रेयाला या प्रसंगावर बोलतं केलं. श्रेया म्हणाली की,”माझ्या या दोन्ही मावशींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आम्ही फक्त खबरदारी घेतली. पण दुसरी लाट आमच्या घरावर येऊन धडकली. या लाटेने माझ्या दोन्ही मावशींना अवघ्या २४ तासांत आमच्यापासून हिरावून नेलं. मी त्या दोघींचीही खूप लाडकी होते. त्या अचानक सोडून जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.” हे सांगताना श्रेयाला अश्रू अनावर झाले.

Team Global: