आ. रोहित पवार यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागतानिमित्त अनोखी भेट;

आ. रोहित पवार यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागतानिमित्त अनोखी भेट; मास्क, सॅनिटायझर आणि कंपास बॉक्स देऊन होत आहे स्वागत!

कर्जत: कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या २ वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारी पुन्हा सुरु झाल्या आहेत. पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह बघून शाळा परत सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शालेय विद्यार्थी आता परत शाळेत येण्यासाठी सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचे आ. रोहित पवार हे अनोख्या पद्धतीने स्वागत करत आहेत.

 

तसेच या विद्यार्थ्यांचे कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यासाठी सुद्धा काळजी घेत आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व शाळा तसेच अंगणवाड्यांमध्ये असणाऱ्या तब्बल ८०००० विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि कंपास बॉक्स देऊन स्वागत केल्या जात आहे. संपूर्ण राज्यात अशाप्रकारचे अनोखे स्वागत केवळ आ. रोहित पवार करत आहेत हे विशेष. आ. रोहित पवार यांच्या सहकार्यातून आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था द्वारा सर्व ६६२ अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक ५८७ शाळांमधील तब्बल ८०००० विद्यार्थ्यांना ही अनोखी भेट दिली जाणार आहे.

 

कोरोना विषाणूपासून रक्षण होण्यासाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे पुनर्वापर करण्याजोगे मास्क, सुरक्षित सॅनिटायझर आणि शालेय साहित्य ठेवण्यासाठी आकर्षक असा कंपास बॉक्स अशी भेट आ. रोहित पवार आपल्या लहानग्या बहीण- भावंडांना देऊन त्यांचे ‘वेलकम बॅक टू स्कुल’ करत आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून स्वतः आ. रोहित पवार देखील विविध शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या या आनंदात सहभागी होत आहेत.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून शिक्षण विभागात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. फिरते तारांगण आणि टेलीस्कोप या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अवकाश आणि ग्रह, तारे याचा अनुभव मिळत आहे. डिजिटल शाळा अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळांना इंटरॅक्टिव पॅनल देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची काळजी हे महत्वाचे असल्यामुळे मोफत चष्मे वाटप आणि गरज असल्यास मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात आल्या आणि भविष्यात हा उपक्रम सुरू असणार. टीच फॉर इंडिया या अग्रगण्य संस्थेच्या माध्यमातून अभिनव शिक्षण प्रणाली कार्यशाळा घेण्यात आली.

 

ज्यामध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सर्व शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती शिकवण्यासाठी सज्ज केले. जिल्हा परिषद अहमदनगर आणि प्रथम शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम शाळा आणि अंगणवाडी स्तरासाठी सुरू केले असून दोन्ही तालुक्यातील शैक्षणिक विकासाला उपयुक्त असे उपक्रम या माध्यमातून सुरू आहेत. ‘शाळा तिथे ग्रंथालय या कार्यक्रमांतर्गत २०० शाळांना पुस्तके आणि पुस्तकांची रॅक मोफत देण्यात येत आहे.

 

असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थेमार्फत राबविण्यात येत असून भविष्यात असे अनेक उपक्रम प्रस्तावित आहेत. शिक्षणाची नवी क्रांती घडवून आणण्याचा आ. रोहित पवार यांचा निर्धार निश्चित पूर्ण होईल.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शिक्षणाचे नुकसान होऊ नये, यासाठी शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे आ. रोहित पवार यांनी स्वागत केले असून याच अनुषंगाने शासनाने योजलेल्या उपाययोजना आणि नियमांचे पालन करावे हे देखील आ. पवार यांनी आवाहन केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: