राज्याच्या ‘या’ भागात थंडीची लाट; हवामानात मोठा बदल

राज्याच्या ‘या’ भागात थंडीची लाट; हवामानात मोठा बदल

पुणे – उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, दिल्ली, चंडीगड, राजस्थान या भागांत थंडीची लाट आली आहे. या थंडीच्या लाटेचे प्रवाह महाराष्ट्र व विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे राज्यातील थंडीत वाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांनंतर राज्यातील थंडी पुन्हा काहीशी कमी होईल. आज रविवारी (ता.३१) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरडे वातावरण झाले आहे. राज्यातील काही भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात थंडीने पुन्हा हुडहुडी भरवली आहे. दरम्यान उत्तर केरळ ते मराठवाडा कर्नाटकाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात मागील दोन दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे. यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात थंडी कमी आहे.

मध्य महाराष्ट्र व विदर्भात थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे सर्वच भागांत थंडी वाढल्याने पारा चांगलाच घरसला आहे.

या भागात किमान तापमानात घट झाल्याने ७ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नोंदविले गेले. मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी असल्याने या भागात १४ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, निफाड भागांत कडाक्याची थंडी असून, पुणे, नाशिक, मालेगाव भागांत बऱ्यापैकी थंडी आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली भागांत काही प्रमाणात थंडी कमी आहे. कोकणातील अलिबाग भागात काहीशी थंडी आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, डहाणू या भागांत थंडी किंचित कमी झाली आहे.

साभार  ऍग्रोवन ई ग्राम

ग्लोबल न्युज नेटवर्क: