नवी दिल्ली | देशाचे गृहमंत्री आणि नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शहा यांनी देशात लवकरच नवे ‘सहकार धोरण’ आणणार असल्याची घोषणा केली आहे. सरकार नव्या धोरणावर काम करत असून लवकरच ते देशातील जनतेसमोर सादर केले जाईल, असे शहा यांनी सांगितले आहे. त्यांनी ही घोषणा देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाच्या व्यासपीठावरून केली.
देशातील सहकारी संस्था या विकासात मोलाचा सहभाग देत असल्याचे सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगत त्यांच्या कारभारात सुसूत्रता आणण्याची गरज व्यक्त केली. देश 5 हजार कोटींच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न घेऊन वाटचाल करत असून हे लक्ष्य पूर्ण करण्यात सहकार खाते मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार क्षेत्राला अधिक मजबूत आणि सक्षम बनवण्यासाठीच सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्याचे ते म्हणाले. इफको, भारतीय राष्ट्रीय सहकारी महासंघ, अमूल, सहकार भारती, नाफेड आणि कृभको यांच्या वतीने दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सहकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारांनी एकत्रित आणि परस्पर सहयोगाने काम केले, तर सहकार चळवळीला सोन्याचे दिवस येऊ शकतात, असे अमित शहा म्हणाले.