९४वे साहित्य संमेलन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा !

 

मुंबई | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. यंदाचे हे 94वे साहित्य संमेलन नाशिकच्या पवित्र भूमीत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नगरीत होत आहे, याचा विशेष आनंद आहे. जगावर आलेले कोरोनाचे संकट परतवून लावत असताना आता आपल्याला आपलं जगणं पुन्हा नव्या दमाने, जोमाने पूर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी साहित्य संमेलनाची ही सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी महत्त्वाची आणि मनाला उभारी देणारी ठरेल.

‘माझा मराठीची बौलू काैतुके, परि अमृतातेही पैजा जिंके!’ असे सांगणाऱया विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे हे 725 वे म्हणजेच सप्तशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मराठी भाषेचा विकास हा आपला सर्वांचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे असे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी केवळ भाषा नाही. ती संस्कृती आहे. या भूमिकेतून मराठी मुलुख एकत्र रहावा यासाठी महाराष्ट्रपुत्रांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांचे स्मरण करणेही आपले कर्तव्य आहे. या सर्व हुतात्म्यांना माझे त्रिवार वंदन.

यंदाचे संमेलन वैशिष्टय़पूर्ण असे आहे. महाराष्ट्राने ज्ञान-विज्ञानाचा वसा प्रयत्नपूर्वक जतन केला आहे. मराठी साहित्य विश्वानेही मनोरंजन, विरंगुळा याच बरोबर वाचकांच्या जाणिवा प्रगल्भ करण्याची भूमिका जाणीवपूर्वक स्वीकारली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरावर प्रबोधनात्मक असा घाव घालण्याचे धारिष्टय़ही दाखवले आहे. असा वैज्ञानिक वारसा जपणाऱया वाटचालीत संमेलनाचे अध्यक्षपद जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर भूषवणार आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांची शस्त्रs यत्न करू. शब्दची आमुच्या जीवांचे जीवन’ या ओळींप्रमाणे हे अक्षरांचे अक्षय धन लुटण्यासाठी आपण दरवर्षी एकत्र येत असतो. या संमेलनाच्या संयोजनाचा मान दुसऱयांदा पटकावणारे नाशिककर गोदाकाठचा हा मेळा संस्मरणीय करतीलच. पण या संमेलनातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसह, आपल्या लेखन प्रयोगांतून मराठीला आणखी समृद्ध, संपन्न करणाऱया ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना मानवंदना दिली जाईल. यातून मराठीतील विविध साहित्यिक प्रवाहांतील नव्या दमाच्या प्रतिभावंताना प्रेरणा मिळेल. या सगळय़ा प्रयत्नांतून नानाविध प्रतिभेचे, सर्जनशील असे अनेक लिहिते हात पुढे येतील अशी अपेक्षा आहे. साने गुरुजींच्या ‘जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगणाऱया या मराठीत विज्ञानेश्वर घडावेत, अभिरूची संपन्न महाराष्ट्र घडावा हीच आकांक्षा आहे. संमेलनात प्रकाशित करण्यात येणाऱया मराठी विज्ञान साहित्याचा इतिहास या स्मरणिकेच्या प्रकाशनास तसेच संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीला मनःपूर्वक शुभेच्छा.

आपला नम्र,
उद्धव बाळासाहेब ठाकरे

Team Global News Marathi: