मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाची बोचरी टीका

 

मुंबई | भाजपाचं हिंदुत्व नकली असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत केला. मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर विविध आरोप केले. त्याला आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी एवढी मोठी सभा घेण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा ई सभा घेतली असती तर सर्वांचे कष्ट तरी वाचले असते. बाकी चहुबाजूंनी त्रस्त झालेल्या पक्षप्रमुख कम मुख्यमंत्र्यांनी आपला त्रागा सभेतून व्यक्त केला असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला.

केशव उपाध्ये यांनी पोस्ट करत म्हटलं की, कुजकट टोमणे, भारंभार इशारे आणि पोकळ धमक्या यांच्यापलीकडे पक्षप्रमुखांचे भाषण गेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून स्वतःच्या हिंदुत्वाचं सत्व गमावल्यानंतर भाजपाच्या हिंदुत्वाला बोल लावण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुखांनी केला. पण भाजपाचं हिंदुत्व किती प्रखर आणि प्रभावी आहे. याची माहिती सर्वसामान्य जनतेला आहे.

पुढे बोलताना उपाध्ये म्हणाले की, बाकी महापालिका निवडणुका जवळ आल्याने मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असे घासून गुळगुळीत झालेले मुद्दे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावरून संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरून भाजपावर निराधार आरोप केले. पण प्रत्यक्षात ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध केला. त्यांच्याबरोबर आपणच सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलोय, हे मात्र पक्षप्रमुख सोयीस्करपणे विसरले असंही त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: