मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; भाजपाची घणाघाती टीका |

 

आजपासून सुरु होणाऱ्या दोन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याच्या तयारीत असलेले दिसून येत आहे.त्यात मंत्री आणि नेत्यांना विरोधक घेरण्याची शक्यता असल्यामुळे भाजपच्या नेत्यांविरोधात सत्ताधारीही आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून असे संकेतही मिळाले आहेत. याच मुद्द्यावरून आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात टीका केली आहे.

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे..” असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेतलीच पाहिजे यासाठी काँग्रेस अडून बसली तरच निवडणूक होईल. ईडीची कारवाई, काही मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, मराठा व ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांवरून अधिवेशनात सत्तापक्ष व विरोधक आमनेसामने असतील. दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन सरकारने लोकशाहीला कुलूप लावले असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी केला असून आता या सरकारविरुद्ध रस्त्यावरचीही लढाई लढू असे सांगितले.

Team Global News Marathi: