नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर असून त्यांचे दिल्लीत आगमन झाले आहे. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय निवासस्थान वर्षाहून दिल्लीला जाण्यासाठी सकाळीच रवाना झाले होते.
केंद्रीय गृह मंत्रालयानं आज दिल्लीत नक्षलवाद प्रभावित राज्यांतील मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यासाठी या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं होत. या बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडे हे सुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत.
या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसचं आजच्या होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, ओरिसा मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रचे उपमुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री बंगालचे मुख्य सचिव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा समावेश आहे.