मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट

 

मुंबई | मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी कुठल्याही पूर्वनियोजित कार्यक्रमाविना ही भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंगळवारी दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. या भेटीवेळी एकनाथ शिंदेंसोबत कुणीही अन्य बडा नेता नव्हता, अशी माहिती पुढे येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही सोमवारी विधानसभेत विश्वासमत प्रस्ताव जिंकला होता. तसेच त्यानंतर धन्यवाद प्रस्तावावर केलेल्या भाषणातून सडेतोड भाषण करत आपल्यावरील आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेले हे भाषण खूप गाजले. तसेच राजकीय वर्तुळातही या भाषणाची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आलेले सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं सूचक भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासमत प्रस्ताव जिंकल्यानंतर शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल, असा दावा केला होता. शरद पवार यांच्या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही तशीच विधाने केली आहेत.

Team Global News Marathi: