बंदसम्राटांचा’ पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले – आशिष शेलार

 

मुंबई | लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आज (सोमवारी) बंदची हाक दिली आहे. याच महाराष्ट्र बंदवरुन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. बंद आणि विरोध यांचा धंदा, गोळा होतो त्यावरच यांचा चंदा, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली आहे.

महाराष्ट्रात आज सत्ताधारी सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने लखीमपूर घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंदचा एल्गार पुकारला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपने बंदमध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन करताना सत्ताधाऱ्यांवर धारदार शब्दांचे बोचरे वार केलेत.

‘बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित’बंदसम्राटांचा’ पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले’ ‘एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय.. कोस्टल रोडला विरोध…नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध.. मेट्रोचेही हे विरोधकच.. हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’ गोळा होतो त्यावरच ‘चंदा’! असा टोला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे

आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’चाल, आई दुर्गामाते जनतेला दे “बळ”! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!, अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

 

Team Global News Marathi: