मुंबई | सार्वजनिक परिसर स्वच्छ राहावा यासाठी मुंबई महापालिकेने ‘क्लीन-अप मार्शल नियुक्त केले होते. या मार्शलना मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे अधिकारही देण्यात आले होते. कारवाईच्या नावाखाली काही मार्शल तोडपाणी अथवा लोकांना दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घाटकोपर येथील अशाच एका घटनेची तक्रार पुढे आली आहे. मात्र संबंधित मार्शल बोगस असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो. काहीवेळा क्लीन-अप मार्शलकडून अरेरावी व दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी येत असतात. असे अनेक दमदाटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. या क्लीन अप मार्शलचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसून येत आहे.
अलीकडे क्लीन अप मर्शलच्या नावाखाली वसुली करणाऱ्या बोगस टोळीचा सुळसुळाट वाढला आहे. घाटकोपर येथे गुरुवारी टिळक रोड येथे बोगस क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून वसुली सुरू होती. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर हे मार्शल पळून गेले. त्यांचे व त्यांच्या मोटारसायकलचे छायाचित्र घेऊन याबाबत पालिकेला तक्रारही करण्यात आली आहे.