चक्क शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली गांजा लावण्याची परवानगी

 

सोलापूर | सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मौजे शिरापूर येथील शेतकरी अनिल पाटील यांनी दोन एकर शेतीमध्ये गांजा लावण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. अनिल पाटील यांना वडिलोपार्जित मिळालेली साडेचार एकर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शेती करत आहेत. त्यांचे वय ५३ असून त्यांना दोन मुले आहेत. सध्या मुले बेरोजगार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे स्वतःचे शिक्षण ३ री पर्यंत झाले आहे. शेती तोट्यात जात असल्याने त्यांच्यावर ४ लाख रुपये कर्ज झाले आहे. या कर्जाचे व्याज भरून त्यांना नाकीनऊ आले असल्याचे त्यांनी सांगितले.


मी कोणतेही पीक केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्याने शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील शेतीच्या उत्पन्नातून निघत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे बील देखील लवकर मिळत नाही.

त्यामुळे गांजाला चांगला भाव मिळत असल्यामुळे मला माझ्या २ एकर शेतीमध्ये दि.१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत लेखी परवानगी द्यावी. अन्यथा १६ सप्टेंबर २०२१ या तारखेपासून आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली. असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. यावर अद्यापही प्रशासनाने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

 

 

Team Global News Marathi: