नितीनजी तुम्ही फार गोड बोलताय पण…

नितीनजी तुम्ही फार गोड बोलताय. पण पत्र मात्र कठोर लिहिता

नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. शिवसैनिक महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणत असल्याची तक्रार यामधून केली होती. त्याबाबतच आज (दि.२०) मुख्यमंत्र्यांनी गडकरींना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, नितीनजी तुम्ही फार गोड बोलताय. पण पत्र मात्र कठोर लिहिता. आज नागपुरातील झिरो माईल येथे फ्रीडम पार्कचे आणि कस्तुरचंद पार्क येथील मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

तुम्ही सुद्धा कर्तव्य कठोर आहात आणि आम्ही कर्तव्य कठोर आहोत. जनतेच्या कामात कुठेही अडथळा येऊ द्यायचा नाही. जनतेच्या विकासाच्या आड कोणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही देतो. शेवटी आपले कर्तव्य आहे. आपल्याला जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षात चांगल्या कामाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मला लाभलं. नागपूर हे उपराजधानी आहे.

 

 

सर्वोत्तम शहरामध्ये गणना व्हावी यासाठी तुमच्यासोबतच आमचीही प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू आहे. आपण अनोखे काम करत आहात. २० मजल्याची मेट्रोची इमारत देशात कुठेच नाही. माणसं जोडताना आपण राजकीय जोडे बाहेर काढून येतो. ती आपली संस्कृती आहे. झिरो माईल हे काय प्रकरण आहे. झिरो माईलला काय महत्वं आहे? हे तुम्ही दाखवून देण्यासाठी फ्रीडम पार्क तयार आहात. कारभाराचे स्पीड ब्रेकर आपल्या विकासामध्ये येत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूरचा विकास जलद गतीने होणार आहे. प्रगती आणि विकास जलद गतीने होण्यासाठी ही मेट्रो आहे, अशा शब्दात गडकरींचे कौतुक देखील केले. तसेच महामार्ग बनविताना आणि उड्डाण पूल बनविताना त्याच्या खाली काय बनणार? त्याचे सौंदर्यीकरण होणार का? याबाबतही थोडं लक्ष द्यावं, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

गडकरींचं पत्र नेमकं काय होतं?
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र समोर आले असून यामध्ये ते म्हणतात, ”पूलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम आमचे मंत्रालय करत आहे. मात्र, वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहेत.

 

वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार रस्ता धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रांची जाळपोळ करुन कंत्राटदाराच्या कामगारांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद पडले आहे.

मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे लवकरच पूर्ण होईल. या रस्त्याच्या लांबीमध्ये पैनगंगा नदीवरील एका पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात.

अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाची कामं सुरू आहेत. वाशिम शहरासाठी बायपास निर्माण करण्याच्या कामाचा देखील समावेश आहे. परंतु, वरील सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील सेनेच्या लोकप्रतिनिधींनी थांबविल्यांचे मला सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, वरील सर्व बाब लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही कसे सुरू ठेवायचे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे असेल त्या स्थितीत ठेवल्यास वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण देखील वाढेल. परिणामी जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागेल.”

ग्लोबल न्युज नेटवर्क: