छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आव्हानाला महाराष्ट्र देणार साथ…..!

 

कोकण विभागातील रायगड ( महाड, तळीये, हिरकणीवाडी ) व चिपळूण या भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूरासह दरड कोसळणे व जमिनी खचणे यांसारख्या दुर्घटना झालेल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्त हानी झालेली आहे. येथील जनतेला आता मदतीची अत्यंत गरज आहे. अतिवृष्टी व कोरोना या दुहेरी संकटात सापडलेल्या आपल्या दुर्घटनाग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी हजारो हात पुढे सरसावत आहेत. मात्र अनेक ठिकाणी रस्ते खचलेले आहेत, घाटमार्गातून वाहतूक करणे धोकादायक आहे. त्यामुळे दूर्घटनाग्रस्त भागात दूर अंतरावरील लोकांनी मदत पोहोचविण्यापेक्षा जवळील नागरिकांनी मदत पोहोचविल्यास ती वेळेवर पोहोचू शकेल व ते अधिक सोयीस्कर व सुरक्षित ठरेल.

मदत पोहोचवत असताना सर्व ओघ एकाच ठिकाणी न जाता सर्व दुर्घटनाग्रस्तांपर्यंत सुनियोजित पद्धतीने योग्य तितकी मदत पोहोचेल, याची काळजी घ्यावी. यासाठी संपूर्ण परिस्थितीची इत्थंभूत माहिती असणारे गावपातळीरील तलाठी व ग्रामसेवकांपासून ते तहसिलदारांपर्यंत व बचावकार्य राबविणाऱ्या स्थानिक तरूणाईपासून ते सैन्यदलांच्या बचाव दलांपर्यंत सर्वांकडून व्यवस्थित माहिती घेऊन, त्यांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त व गरजू कुटूंबापर्यंत मदत पोहोचवावी.

आपल्या मदतीमध्ये शक्यतो जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असावा. शिधा, कपडे, ब्लँकेटस्, साबण, टूथब्रश, लहान मुलांची कपडे, डासांचा स्प्रे याचबरोबर मास्क व प्रथमोपचार कीट, सँनिटरी नँपकीन्स, ओआरएस, पिण्याचे शुद्ध पाणी, निर्जंतुकीकरणासाठी सँनिटायजर्स, ब्लिचिंग पावडर, फिनाईल, डेटॉल अथवा सेवलॉन लिक्विड या वस्तूंच्या किटचा प्रामुख्याने समावेश असावा.

रायगड ( महाड, तळीये, हिरकणीवाडी ) व चिपळूण यांसह इतरही अनेक ठिकाणी छोट्यामोठ्या दुर्घटना झालेल्या आहेत. तेथील दुर्घटनाग्रस्त देखील दुर्लक्षित न राहता, त्यांच्यापर्यंतही पुरेशी मदत पोहोचावी, याबाबत दक्ष रहावे. मदत पोहोचविलेल्या ठिकाणांच्या एकत्रित नोंदी घेऊन पुढे येणाऱ्या मदतींचे वाटप उर्वरीत भागांत समसमान पद्धतीने करण्यासाठी योग्य नियोजन करावे. तसेच मदत पोहोचवत असताना ती सुरक्षिततपणे दुर्घटनाग्रस्त भागांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची अवस्था कशी आहे, याबाबतही पूर्वपडताळणी करण्याची दक्षता घ्यावी, त्याचबरोबर मदत घेऊन जाणाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.

मदतीसाठी संपर्क : अमर पाटील 9850508671 , सोमनाथ लांबोरे 9623530889 , प्रविण पवार 9850952727 , अजयसिंह पाटील 9922414130

Team Global News Marathi: