बीड | खासदार छत्रपती संभाजीराजेंनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना शाब्दिक प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं.
आता त्यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडने खासदार छत्रपती संभाजीराजेंना खुली ऑफर दिली आहे. संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही राजेंना आपलं समजतो. संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना बाहेर पडावं लागेल. पक्ष काढावा लागेल. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली आहे.
तसेच छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केला. यावर राजे काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.