छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

 

छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आमचं प्रेम आहे. आम्ही त्यांच्याशी कायम संपर्कात असतो. परंतु निवडणूक ही वेगळी असते. निवडणुकीत कोण कोणत्या भूमिका घेऊन उभं राहतो त्याकडे पाहिले जाते. संसदेत त्यांना बोलू दिलं नाही तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी राहिलो त्यामुळे छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेना राज्यसभा निवडणुकीत २ जागा लढवणार आहे. लोकशाहीने सगळ्यांना एका मताचा अधिकार दिला आहे. तसेच निवडणुकीत उभे राहण्याचाही अधिकार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर प्रेम आहे.

मात्र निवडणुकीत कोणत्या भूमिका घेऊन उभे राहतात याकडे पाहिले जाते. छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता. मराठा आरक्षणावर त्यांना संसदेत बोलून दिले नाही तेव्हा मी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभा राहिलो होतो असंही त्यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले की, राज्यसभेच्या ६ जागा आहेत. त्यात भाजपाच्या २, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ जागा निश्चित निवडून येतील. पण त्याव्यतिरिक्त सगळ्यांकडे काही मते शिल्लक आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे १ जागा असताना शिवसेनेने मोठे मन दाखवत राष्ट्रवादीला एक जागा सोडली होती. तेव्हा शरद पवारांनी पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला २ जागा देण्याचं कबूल केले होते. अलीकडेच शरद पवार, उद्धव ठाकरे यांची बैठक झाली आहे.

त्यात याबाबत चर्चा झाली असावी. कुणी किती जागा लढवायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. १० सूचक जे आणतील ते जागा लढवू शकतात. संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांशी कुठलेही चर्चा झाली नाही. सर्वोच्च नेते बोलतील असंही त्यांनी सांगितले. तर शरद पवारांनी मात्र राज्यसभा निवडणुकीतील निकाल हे त्या त्या पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून असतात.

आम्ही या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चर्चा केलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अतिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ. शिवसेनेकडेही काही अतिरिक्त मतं आहेत. काँग्रेसकडेही संख्याबळ आहे. अशाप्रकारे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याव्यतिरिक्तची अतिरिक्त मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं म्हटलं.

Team Global News Marathi: