चंद्रकांत पाटलांना पुन्हा शाईफेकीची धमकी; सोशल मीडियावर धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा

 

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाई फेक करण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकवर अशी धमकी देणाऱ्या दोघांवर पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवडमधील पवना थडी जत्रेचं उद्घाटन करायला सायंकाळी पाच वाजता सांघवीत येणार आहेत. त्यावेळी तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.’ पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली आहे. ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरेने याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील आज पवना थडी जत्रेचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे फेसबुक पोस्ट करणाऱ्यांना अद्याप सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही, त्यामुळे आज पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. द्वेष भावना पसरविणे आणि धमकी देणे याबद्दल 152, 505 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: