चंद्रकांतदादांना कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात – सामना

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ”ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला?, कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे अग्रलेखात म्हंटले आहे की, प्रश्न हा चंद्रकांतदादांच्या धमकीचा नसून तो केंद्रीय तपास पथकांच्या राजकीय गैरवापराचा आहे. ‘ईडी’शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ”आमची ‘वर’ सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो,” अशी भाषा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. ”केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करु” ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही.

एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात! चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात असा टोला सुद्धा लागवण्यात आला होता.

Team Global News Marathi: