राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना हवामान खात्याचा हाय अलर्ट

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना हवामान खात्याचा हाय अलर्ट

पुणे, 29 ऑक्टोबर: यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने (Rain in maharashtra) पूर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rainfall) कोसळला आहे. मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.

1 आणि 2 नोव्हेंबर रोजी हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला असून याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

मंगळवारी राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी 2 नोव्हेंबर रोजी राज्यात रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

खरंतर, दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रीय होणार आहे. पण हे कमी दाबाचं क्षेत्र तीव्र न होता, सामान्य अवस्थेतचं पश्चिम दिशेनं पुढे सरकणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: