चक्क शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ राष्ट्रवादीच्या आमदाराची सुरु झाली चौकशी

 

सोलापूर | केंद्रीय तपासयंत्रणाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यावर होत असलेल्या कारवाईवरुन राज्यात रणकंदन सुरु आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष ईडी कारवाईवरुन केंद्रातील भाजप सरकारवर थेट निशाणा साधत आहेत. राज्यात अशी परिस्थिती असली तरीही सोलापुरात सत्तेतील शिवसेना नेत्याने केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माढ्याचे आमदार बबन शिंदे ईडीच्या रडारवर आले आहेत.

आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांची आज ईडीच्या पथकाने पाच तास चौकशी केल्याचं कळतंय. रणजितसिंह शिंदे यांची नुकतीच सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदावर निवड झाली आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्याच्या प्रकरणात ईडीने आज शिंदे पिता-पुत्राची चौकशी केल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर बेबनाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

माढा तालुक्यातील नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्याविरुद्ध एका सूतगिरणी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार ईडी, सेबी आणि आयकर विभागाकडे केली होती. यानंतर संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्या साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे कोकाटे यांनी केवळ तक्रार करुन न थांबता त्याचा पाठपुरावाही केल्यामुळे ईडीने आज सोलापुरात शिंदे पिता-पुत्रांची चौकशी केल्याचं बोललं जातंय.

Team Global News Marathi: