चक्क आमदाराच्या घरात चोरट्याने मारला डल्ला

 

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादच्या निवास्थानी चोरीची घटना ताजी असतानाच, आता हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मुटकुळे यांच्या आडगाव येथील घराचे कुलूप तोडून आतमधील कागदपत्रे व साहित्य फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी इतर चार ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न केला असल्याचे समोर आलंय. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार मुटकुळे यांचे आडगाव मुटकुळे हे गाव आहे. काही दिवसांपूर्वी या गावात त्यांनी नवीन घराचे बांधकाम केले. नवीन घर बांधले असले तरीही त्यांचे कुटुंबीय जुन्या घरीच राहतात. दरम्यान 18 डिसेंबरला आडगावात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात प्रवेश केला. गावात आलेल्या चोरट्यांनी आमदार मुटकुळे यांच्या नवीन घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून कागदपत्रे व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. नवीन घर असल्याने त्या ठिकाणी कोणी सद्या राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

आमदारांच्या घरात काहीच हाती न लागल्याने चोरट्यांनी गावातील इतर ठिकाणी मोर्चा वळवला. यावेळी गावातील ज्ञानबा नवसाजी मुटकुळे, भाऊराव किसनराव मुटकुळे, नारायण सखाराम मुटकुळे यांच्या घरी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण येथेही डाव फसला आणि चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. पुढे चोरटे भागवत पुंजाजी खोरणे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेले शेळीचे दोन पिल्ले घेऊन फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तर याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: