चंद्रकांत पाटलांनी आई- वडिलांवर केलेल्या वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला,

 

एकवेळ आईवडिलांना शिव्या द्या पण पंतप्रधान मोदींना आणि शहा यांना नको असे विधान भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते आता या विधानावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. एकवेळ आई- वडिलांना शिव्या दिलेल्या सहन करीन; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांना नाही, हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य योग्य वाटत नाही. नेत्यांवर प्रेम असावे; पण आई- वडिलांचा आदर राखला पाहिजे, असा टोला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

बाळासाहेब थाेरात म्हणाले, शिवसेनेतील वादावर निवडणूक आयोगाने दिलेला निकाला धक्कादायक आहे. देशातील प्रत्येक नागरिकांने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. देश कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. भाजपने सुरू केलेले राजकारण देशाला घातक असून त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

तसेच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष कायम राहणार आहे. ते शिवसेना पुन्हा नेटाने उभी करण्यास समर्थ आहेत. महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे. राजकारणात वाद- विवाद होत असतात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसबाबत जे काही विधान केले. ते भाजपला मान्य नसेल तर देशाच्या स्वातंत्र्यांमध्ये ‘आरएसएस’ होते हे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान थोरात यांनी दिले.

Team Global News Marathi: