सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ काम मनसेने अधिकाऱ्याशी हुज्जत घालून थांबवलं काम !

 

कल्याण | भिवंडी – कल्याण – शीळ या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार अनेकदा विविध संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनीही याच रस्त्याचे निकृष्ठ काम झाल्याचा आरोप करीत अधिकाऱ्याशी हुज्जत घालत या रस्त्याचे काम बंद पाडले आहे.

भिवंडी – कल्याण – शीळ या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने या महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्त्यावरून कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर तसेच मुरबाड येथे जाण्याकरीताचा एकमेव व महत्वाचा तसेच मुख्य रस्ता असून हजारो हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत असते .

भिवंडी-कल्याण-शिळ सहापदरी सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविण्यात येत असून लॉकडाऊनच्या काळात देखील हे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परंतु या काळात तयार करण्यात आलेला रस्ता निकृष्ठ दर्जाचा असल्याची तक्रारी केल्या होत्या. मे,साकेत इन्फ्रा ह्या कंपनीच्या माध्यमातून हलक्या दर्जाचे सिमेंट काँक्रेट या रस्त्याच्या कामासाठी वापरले जात असून ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले असून कामही संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आजही टोलनाका ते पिंपळघरपर्यत वाहतूक कोंडीची समस्या कायमच आहे.

भिवंडी बायपास येथे चक्क मातीवरच रेडी मिक्स सिमेंट टाकून रस्ता बनवला असल्याचे पुरावे देखील त्यावेळी मनसेचे चौधरी यांनी यापूर्वीही रस्ते विकास महामंडळाला सादर केले होते. तसेच स्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत व ठेकेदारावर कारवाई व्हावी तसेच संबंधित कामाची आयआयटी मार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र त्यावर संबधित विभागाने काय कार्यवाही केली ? असा प्रश्न आजही कायम असल्याचे दिसून आले.

Team Global News Marathi: