राष्ट्रवादीत निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी; रखडलेले प्रवेश लवकरच होतील – जयंत पाटील

राष्ट्रवादीत निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी; रखडलेले प्रवेश लवकरच होतील –

सोलापूर : राष्ट्रवादीत (NCP) आता आगामी निवडणुकांमध्ये नवा आणि जुना असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पक्षवाढीसाठी नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेतले आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच निवडणुकीला उभे राहण्याची संधी दिली जाईल. काही कारणांमुळे रखडलेले प्रवेश लवकरच होतील. सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील अनेक दिग्गज नजीकच्या काळात राष्ट्रवादीसोबत दिसणार, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद कार्यक्रमातून पाटील यांनी हेरिटेज लॉनमध्ये सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, कार्याध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते.

सोलापूर हा पक्षाध्यक्ष शरद पवारांवर प्रेम करणारा जिल्हा आणि शहर आहे. मात्र, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता का नाही? सोलापूरला राष्ट्रवादीचा आमदार का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना ‘महेश कोठे’ असे उत्तर मिळाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर, स्मार्ट सिटीच्या कामाबाबत सोलापूरकरांमध्ये असंतोष आहे. भाजपने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, त्यामुळे सोलापूरकरांना राष्ट्रवादीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्यात मतभेद असतील तर मतभेद दाखवायचे नाहीत. महापालिका निवडणुकीतून आपला गट वाढविण्याऐवजी निवडून येणाऱ्या व्यक्तीला संधी देण्याचा आग्रह धरून बेरजेचे राजकारण करा, अशा सूचनाही पाटलांनी यावेळी दिले आहे.

महापालिका निवडणुकीपर्यंत मी स्वतः तीन ते चारवेळा सोलापूरला भेट देणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सोलापूर शहर व जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करणार आहे. सोलापूर महापालिका, जिल्हा परिषदेसह आगामी निवडणुकीत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सोलापूरचे नेते चांगले

जुने-नवे वाद, गट तट सोडून द्या. पुढे जाणाऱ्याचे पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून द्या, अशी मत पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केली. सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते चांगले आहेत. पण त्यांच्यासोबत असणारे काही लोक लावालाव्या करतात. नुसत्या तक्रारी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही पालकमंत्री भरणे यांनी दिला

ग्लोबल न्युज नेटवर्क: