मुंबई | महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. १०५ आमदार असलेला भाजपा आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे अशी आठवण करुन देत सेनेकडून भाजपला आकडेमोड समजवून सांगण्याचा प्रयत्न सामनाच्या अग्रलेखामधून केला आहे.
‘या निवडणुकीत भाजपाने निर्णय घेतला होता की आमचं स्थानिक नेतृत्व ती निवडणूक लढेल. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिलं आहे. २२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत.
तसेच तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते तीन पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला आहे’, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
‘महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत.
ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने ७३ पेक्षा ३३ आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.