नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना निधीवाटपातल्या अन्यायाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसत आहे अशी टीका केली होती. मात्र, याला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना घेण्यात येत असलेल्या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार फिरकलेच नाहीत. यांना बजेटचे काही पडलेले नव्हते. हा देशाचा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, ट्रान्सपोर्ट, शिक्षण या सगळ्यासाठी राज्याला निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही खूप मोठा हिस्सा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे समजून घ्यायचे नाही. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सर्वच ठिकाणी आहे. अजित पवारांनी बजेट थोडे बघण्याची गरज आहे, असा टोलाही भागवत कराड यांनी लगावला.
बजेट प्रिपरेशनसाठी दोन वेळा बैठक झाली. अजित पवार येऊ शकले नाहीत. राज्यमंत्री देखील आले नाहीत. त्यांना बजेटमध्ये काय रस होता. तर केवळ मेल पाठवला आणि नंतर केवळ एक अधिकारी पाठवला. त्यांनी बजेटमध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जबाबदारी पाळली की नाही, याबाबतही त्यांना विचारा, असे भागवत कराड यांनी म्हटले आहे.