रक्ताच्या वारसदारांनी दलितांची दिशाभूल केली- डॉ. राऊत यांचा आरोप

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसदार मी नसलो तरी मी त्यांच्या विचारांचा वारसदार आहे. माझा हात जरी कापला तरी माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून ‘जय भीम’ हा आवाज ऐकू येईल,अशा शब्दांत राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नाव न घेता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर तीव्र हल्ला चढविला. काँग्रेस हाच पक्ष दलितांच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष आहे, या पक्षाच्या पाठिशी सर्व दलित समाजाने उभे रहायला हवे,असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले.

खामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे विदर्भ विभागीय अध्यक्ष गौतम गवई यांनी आयोजित केलेल्या आंबेडकरी कलावंत व मजूर यांच्या मेळाव्यात डॉ. राऊत बोलत होते. आंबेडकरी समाजाची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांवर ते केवळ आंबडेकरी परिवाराचे सदस्य आहेत म्हणून विश्वास ठेवू नका, असे आवाहन करताना काँग्रेसचे आघाडीचे नेते डॉ. राऊत यांच्यारूपाने हजारो लोकांनी एक मुलूख मैदान तोफ धडाडतांना ऐकली. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता ते भाजपला मदत करीत असल्याचा आरोप त्यांनी रोखठोक शब्दांत केला.

“तथागत गौतम बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांनी मोठे पद देण्यास त्यांनी मनाई केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यानंतर आपल्या कुटूंबातील सदस्यांना महत्वाची पदे द्या असे कुठेही म्हटले नाही. माझ्या कुटूंबाची पूजा करा, त्यांना देव माना असे ना गौतम बुद्ध म्हणाले ना डॉ. आंबेडकर. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा मानणाऱ्या व्यक्तींनी केवळ आंबेडकरांच्या कुटुंबातील सदस्य आहे म्हणून एखाद्या नेत्याला दैवत मानणे चुकीचे आहे. रक्ताचे वारसदार असलेले हे नेते पांघरूण घेऊन समाजाला चुकीच्या दिशेने नेत आहेत,”अशा शब्दांत डॉ. राऊत यांनी आंबेडकरांवर शाब्दिक हल्ला चढविला.

Team Global News Marathi: