ठाणे | मुंबईतील कोरोना संसर्ग परिस्थिती आटोक्यात आली असून याच पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंधांतही अधिक शिथिलता देण्यात आली आहे. मात्र मुंबईतील सर्वसामान्य तसेच दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना अजूनही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली नाही. लसवंतांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशा मागणीसाठी भाजपकडून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चगेट स्टेशनहून लोकलने प्रवासही केला. भाजपची मागणी राजकारण वाटत असेल तर हाय कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
भाजपच्या रेलभरो आंदोलनामध्ये काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर भाजप नेते मंगल प्रभात लोढा आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकल प्रवास केला आहे. यावेळी दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला
ते म्हणाले की, “लोकल प्रवासाची विनंती करुन कसं तरी आत आलो, आत आल्यावर ट्रेनमध्ये बसल्यानंतर ही लोकल कारशेडमध्ये जात असल्याचे सांगितले. अशी कुठल्या प्रकारची वागणूक आणि नियोजन सरकारच आहे. प्रवास पण शांत करु देत नाही आणि आंदोलनही करुन देत आहेत. तिकीट मागत आहोत मात्र देण्यास काचकूच करत आहेत” अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.