नागपूर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात जोरात इनकमिंग सुरु झाली होती. तर दुसरीकडे नागपुरात वेगळे चित्र पाहायला मिळाले आहे. नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं जोरदार धक्का दिला आहे. बुटीबोरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या दोन नगरसेविकांनी भाजपात प्रवेश केला.
नागपूर महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना शिवसेना पक्षसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विकासनिधी मिळत नसल्याने या नगरसेवकांची शिवसेनेवर नाराजी होती. तसेच, शिवसेनेचे आणखी काही कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या प्रयत्नामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर काँग्रेसच्याही काही कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची गेल्या निवडणूकीतंच छुपी युती होती, शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलाय, आता आगामी निवडणूकीत सेना – राष्ट्रवादी एकत्र लढली तरिही काही परिणाम नाही, आम्ही निवडणूकीच्या राजकारणातून शिवसेनेसा संपवल्याशिवाय राहणार नाही” असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. आगामी सर्व निवडणूका जिंकण्याचा विश्वासंही त्यांनी व्यक्त केला आहे.