भाजपच्या आमदारांनी दुकान नव्हे तर ‘मॉल’च उभे केले, शरद पवार भडकले

 

चिंचवड आणि भोसरीच्या भाजप आमदारांनी पिंपरी-चिंचवड शहर वाटून घेतले. ही तुझी आणि ही माझी बाजू असे वाटप केले. या आमदारांनी दुकान न मांडता मॉलच उभे केल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर केला. दरम्यान, पक्षाच्या आत्ताच्या कार्यकारिणीत सुसूत्रता नाही. अध्यक्ष कायम गोंधळलेले असताना अशा तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे माजी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहरात नात्या-गोत्यांचे राजकारण चालते. त्यातूनच मावळ लोकसभा मतदारसंघातून तीनही वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. २००९ मध्ये आझम पानसरे, २०१४ मध्ये राहुल नार्वेकर आणि २०१९ मध्ये पार्थ पवार यांच्या पराभवाला आपलीच लोक कारणीभूत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने आझमभाई पानसरे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी जाती-पातीचे राजकारण आडवे आले. तर, २०१४ च्या निवडणुकीत ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी गाववाले-बाहेरचा हा मुद्दा आडवा आला. आता २०१९ च्या निवडणुकीतही पार्थ पवार उमेदवार असतानाही नातीगोती, गावकी-भावकीच्या राजकरणातून आपल्याच लोकांनी मनापासून काम केले नाही.

आपल्याच लोकांमुळे पार्थचा पराभव झाल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या. शहरातील नातीगोती अन् जातीपातीचे राजकारण पक्षाला घातक ठरत आहे. त्यामुळे पक्ष वाढत नाही. पक्षाचे नुकसान होते. अशा तक्रारी माजी नगसेवकांनी शरद पवार यांच्यासमोर सांगितल्या. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांना ३० टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.

Team Global News Marathi: