‘करोनाचे विषाणू सापडले तर फडणीवसांच्या तोंडात कोंबेन, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात केले होते. गायकवाड यांच्या विधानामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांनी गायकवाड यांचा पुतळा जाळला होता. आता संजय कुटे आणि संजय गायकवाड यांच्यातील हा वाद आणखी चिघळण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
या वादानंतर बुलडाण्यात दाखल झालेले भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे बुलडाण्यात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. ही दगडफेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली असून त्यांना अटक झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा संजय कुटे आणि इतर भाजप नेत्यांनी बुलडाण्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयात घेतला.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्यानंतर भाजप आमदार संजय कुटे यांनी संजय गायकवाड यांच्या वर सडकून टीका केली. संजय गायकवाड यांनीही पातळी सोडत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजपचे संजय कुटे थेट बुलडाण्यात दाखल झाले. दरम्यान, संजय कुटे परत जात असताना त्यांच्या गाडीवर दगड फेक झाली.