सातारा | भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ झाल्याचे वृत्त समोर येत असून साताऱ्यातील माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मायणी इथल्या छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्थेची आणि सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार जयकुमार गोरे हेच या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह संस्थेच्या सचिव आणि आमदार पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम आणि महम्मद खान या सहा जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडूज पोलिसांनी स्मिता कदम यांना अटक केली आहे. आप्पासाहेब देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संस्था आणि यातील प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर संबंधितांनी पहिली बॉडी बरखास्त करत धर्मदाय आयुक्त कार्यालयात जमीन मिळकतीच्या अनुषंगाने पीटीआर उतारे मिळवण्यासाठी कागदपत्रे सादर केले. या कागदपत्रांमध्ये स्थानिक दैनिकात जाहिरात दिल्याची खोटी प्रतही धर्मदाय आयुक्त कार्यालयास सादर केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीच्या आधारावर आमदार जयकुमार गोरे यांच्यासह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.