भाजपा नेते समरजितसिंह घाटगेंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा |

 

कोल्हापूर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष विविध मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपा जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आघाडी सरकारला गंभीर इशारा देत मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

कोल्हापूरतील एक मंत्री परवाच म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान देणारच? पण केव्हा ते सांगा ना? ते तुम्ही सोयीस्कररित्या सांगत नाही. याप्रश्नी सरकार चालढकल करीत आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. शेतकरी भीक मागत नाही. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. उद्रेक झाला तर तुम्हाला घराचे बाहेर फिरणे अवघड होईल’असा इशारा राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

नुकतेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंबंधी वक्तव्य केले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष घाटगे यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता प्रोत्साहन अनुदानावरुन त्यांना टोला लगाविला.राज्य सरकारकडे आश्वासनाची खैरात करावयासाठी पैसे आहेत. गरीब मंत्र्यांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी, तसेच मंत्र्यांची मुंबईतील निवासस्थानाची थकलेली बिले भरण्यास पैसे आहेत.परंतु या सरकारला आज दीड वर्ष झाले तरी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत.

Team Global News Marathi: