भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा समर्थकांसोबत आज मुंबईत साधणार संवाद !

 

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे बीड जिल्हा भाजपत पसरलेला असंतोष वाढला असून, जिल्ह्यातून जवळपास ७० जणांनी जिल्हाध्यक्षांकडे आपल्या पदाचे राजीनामे पाठविले आहेत. हे राजीनामे घेऊन भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे मंगळवारी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंडे भगिनींचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले असून, मंगळवारी त्यांच्याशी पंकजा मुंडे ह्या संवाद साधतील अशी माहिती समोर येत आहे

राजीनामे देणाऱ्यांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक, सभापती, उपसभापतींचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, केजच्या आमदार नमिता मुंदडा, विधान परिषद सदस्य आ. सुरेश धस यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची काय भूमिका असेल? याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे.

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील २०१९च्या निवडणुकीतील भाजपचे पराभूत उमेदवार रमेश आडसकर यांनीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी त्यांचे पुतणे आणि केज पंचायत समितीचे उपसभापती हृषीकेश आडसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपण सर्वांसोबत असल्याचे स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर आ. सुरेश धस यांनी बीडमध्ये मोर्चा काढला तेव्हा खा. डॉ. प्रीतम मुंडे रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर आ. धस यांच्याच आष्टीत माजी आ. भीमसेन धोंडे यांना सोबत घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत होत्या. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांची मोर्चातील अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. विशेष म्हणजे मोर्चाला गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, माजी आ. आर.टी. देशमुख यांची आवर्जून उपस्थिती होती. या सर्व पार्श्वभूमीवर या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष लागले.

Team Global News Marathi: