भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या घराची झाडाझडती, सहा अधिकाऱ्यांनी केली बांधकामाची पाहणी

 

मुंबई | भाजप नेते मोहित कंबोज यांच्या सांताक्रुझ येथील खुशी प्राईड ब्लमोडो इमारतीची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सुमारे साडेतीन तास कसून झाडाझडती घेतली. त्यांच्या मालकीच्या चार मजल्यांसह पूर्ण १४ मजली इमारतीच्या प्रत्येक भागाची, मूळ नकाशाप्रमाणे बांधकाम झाले आहे का, याची पडताळणी करण्यात आली. तसा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांताक्रुझ येथील एसव्ही रोडवरील खुशी प्राईड ब्लमोडो या १४ मजली इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याबाबत एच/पश्चिम विभागाने महापालिका अधिनियम १९८८ अंतर्गत कलम १४४ अन्वये सोमवारी तपासणी करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मुंबा महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले. त्यावेळी कंबोज घरी उपस्थित होते.

त्यांच्या मालकीचे १०, ११, १२ व १३ हे मजले आहेत. हे सर्व मजले व तेथील बांधकाम मूळ नकाशाप्रमाणे आहे का, याची तपासणी करण्यात आली. व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. त्यानंतर १४ व्या मजल्यावरील बांधकाम तपासण्यात आले. सुमारे चार वाजण्याच्या सुमारास पालिकेचे पथक या इमारतीतून बाहेर पडले.

यावर बोलताना कंबोज म्हणाले की, आपण नियमबाह्य बांधकाम केलेले नाही. मात्र जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. परंतु आपण घाबरणार नाही. शिवसेना व महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढत राहू, असे भाजप नेते मोहित कंबोज यांनी सांगितले.

Team Global News Marathi: