मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप लगावत एकच खळबळ उडाली होती. सतत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांचे पितळ उघड पडले होते. त्यातच शनिवारी भाजपा नेते मोहित कंबोज यांनी काल पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील पाटील यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला होता. आता या आरोपांना नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी सांगितले की, ६ प्रकरणातून समीर वानखेडे यांना वेगळं केले. त्यात आर्यन खान, समीर खानची केस आहे. ज्या प्रकरणाची चार्जशीट फाईल झाली त्यात पुन्हा तपासणी का करणार आहात? बोगस केस आहेत त्यात समरी दाखल करून निष्पापांना सोडून द्यावं. जीव धोक्यात घालून, कुटुंबाची पर्वा न करता ही लढाई लढतोय. पहिल्यांदाच एनसीबीने फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टविरोधात कोर्टात आव्हानं केले आहे.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. सुनील पाटील अमित शाहसोबत फोटो आहेत. गुजरातच्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत. आम्ही फोटोवर आरोप लावत नाही. सुनील पाटील हादेखील समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. मी ६ तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यानंतर २ तासाने मला सुनील पाटीलचा फोन आला. मला आणखी काही माहिती द्यायची असल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्याला मुंबईत यायला सांगितले परंतु तो आला नाही अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.