भाजपचा पदाधिकारी लाचप्रकरणी अटकेत; देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच फोटो वायरल

 

पुणे | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री वादग्रस्त विधाने करून आणि अनेक प्रकरणातून पक्षाचे नाव बदनाम करताना दिसून आले आहे. त्यातच अशीच एक घटना राज्यात घडलेली आहे. शिरूर तालुक्‍यातील एका शिक्षणसंस्थेतील शिपायाला नोकरीवरून काढून न टाकण्यासाठी तसेच भविष्यातील पेंशन मिळवून देण्यासाठी अडीच लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी भाजपचे कार्यकारिणी सदस्य असलेले शिवाजीराव भुजबळ यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

लाज मागितल्याप्रकरणी शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ, मंगल शिवाजीराव भुजबळ व संदीप रंगनाथ गायकवाड असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र शिवाजीराव भुजबळ यांचा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपचे कार्यकारिणी सदस्य असलेले शिवाजीराव भुजबळ यांची शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे येथे समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय ही शिक्षण संस्था आहे. भुजबळ यांची पत्नी संस्थेच्या अध्यक्ष पदावर आहे. शिक्षण संस्थेमध्ये तक्रारदार युवकाचे वडील शिपाई पदावर नोकरीला आहेत. ते नेहमी आजारी असल्याने त्यांना नोकरीवरून काढून न टाकण्यासाठी तसेच भविष्यात पेंशन योजना मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे तीन लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

दरम्यान त्यांच्यामध्ये चर्चा होऊन दोन लाख पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत शिक्षण संस्थेत शिपाई असलेल्या व्यक्‍तीच्या नातेवाइकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने चंदननगर पुणे येथे तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचला. दरम्यान तक्रारदार यांच्याकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Team Global News Marathi: