राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून त्यावरून शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तब्बल २६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल करून तो पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ मार्च ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट आणि ट्विटर अकाउंट यावर घडला आहे. त्यानुसार पेज सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब पोस्टेड बाय धनंजय जोशी, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय सोनाली राणे, भाजप सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र पोस्टेड बाय मधुकर वाघमारे, टकलु हैवान, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेज चालविणाऱ्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
तसेच फेसबुक अकाउंट धारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वम्बर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस जोशी, नाना पंडित, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्विटर अकाउंट धारक रुद्रादेव , विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.