मोठी बातमी | काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवणार ?

 

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली आहे. शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची देखील माहिती आहे.

शरद रणपिसे यांच्या निधनाने या रिक्त झालेल्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने महाविकासआघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. २९ नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. १६ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

शरद रणपिसे यांच्या रुपानं अनुसूचित जातीचं नेतृत्व काँग्रेसनं विधानपरिषदेत दिलं होतं. त्यामुळे ही जागा या समाजालाच मिळावी असा तर्क करत काँग्रेसमध्ये काही इच्छुक सरसावले आहेत. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र देहाडे हे इच्छुकांच्या शर्यतीत होते. विधानपरिषदेत रणपिसे काँग्रेसचे गटनेते म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनानंतर परिषदेत अनुसूचित जातींचा एकही आमदार नाही, त्यामुळे ही जागा एससी समाजालाच मिळावी असा आग्रह काहींनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती समोर येत आहे.

Team Global News Marathi: