आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 0.50 टक्क्यांची वाढ, घर-गाडीचा EMI वाढणार

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी नवीन पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 4.40 वरून 4.90 वर पोहोचला आहे. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी पतधोरण समितीने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने कर्जे आणखी महाग झाली आहेत. घराचा आणि गाडीचा EMI वाढल्याने आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोझा पडणार आहे.

रिझर्व्ह बँकेने महिन्याभरात दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. गेल्या महिन्यात 4 तारखेला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अचानक पत्रकार परिषद घेत रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली होती. वाढत्या महागाईवर तोडगा म्हणून कर्जे महाग केल्याचे शक्तीकांत दास यांनी म्हटले होते

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

Team Global News Marathi: