भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक |

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला आज सकाळी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. रात्री गिरीश चौधरींची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर चौधरी यांना अटक करण्यात आली.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये खडसे यांच्यावर झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.

एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसेंनी केला होता. मात्र आता ईडीच्या चौकशीनंतर खडसेंच्या जावयाला अटक केल्यानंतर खडसे आता काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे,

Team Global News Marathi: