भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?-सामना

 

मुंबई | मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला असून परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या कोकणात गेले आहेत. तसेच कोकणाकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा दाखवत ठाकरे सरकारला इशारा दिला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून टीका केली आहे.

सामना अग्रलेखात राऊत म्हणतायत की,’उत्तर प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पन्नासेक मंत्र्यांचा शपथविधी करून घेतला. त्यातील २२ मंत्र्यांवर भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे नोंदवली आहेत व त्या मंत्र्यांना किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोव्यातही वेगळी स्थिती नाहीच. हे असले गुड गव्हर्नन्स तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न. फडणवीस यांनी २०२४ ची तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, पण तोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा देशात पुरती मलिन करायची, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा पायाच पोखरून टाकायचा. प्रशासनावर चिखलफेक करून, खोटे आरोप करून प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची करायचे, हे कसले धोरण? हे असले राजकारण महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते.’

दरम्यान, दापोलीत परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट आहे की नाही, ते कायदेशीर की बेकायदेशीर ते ठरवायला न्यायालय व शासकीय यंत्रणा आहेत, पण हातात हातोडा व सोबत गावगुंडांची फौज घेऊन कोकणात घुसणाऱ्यांना फडणवीस कसे काय समर्थन देऊ शकतात? हिंमत होती तर धडक जायचे. प्रसिद्धीसाठी इतका गाजावाजा करीत, बोंबा मारत जायची गरज नव्हती. यांना फक्त सरकारची बदनामी करायची आहे व वातावरण खराब करायचे आहे. हेच ते सोमय्या ज्यांनी मुंबईतील शाळांत मराठी भाषा सक्तीची असण्याला विरोध केला होता अशी आठवण सुद्धा सामना आग्रलेखातून करून दिली होती.

Team Global News Marathi: