भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे आघाडीवर नगर जिल्ह्यात बळदेण्याचा पक्षाचा निर्णय

 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला असला तरी अन्यमंत्र्यांचा शपथविधी व खातेवाटप अद्याप झाले नाही. दोन्ही पक्षातील बरेच नेते आणि आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यात आता कोणाची वर्णी लागते हे पहाणे महत्वाचं ठरणार आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद लवकरच रिक्‍त होणार आहे. आता या पदासाठी नुकतेच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले प्रा. राम शिंदे यांचे नाव पुढे आले असून “ओबीसी’ चेहरा म्हणून आ. शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन राज्यात “नव समीकरण’ करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सध्या प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार यांची जोरदार चर्चा रंगत असून या पदासाठी आमदार आशिष शेलार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी विधान परिषदेचे आ. राम शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये आ. शिंदे यांच्याकडे गृह, पणन, पर्यटन, आरोग्य, राज्यमंत्रीपदासह ओबीसी, राजशिष्टाचार, मृद जलसंधारण या महत्वाच्या चार खात्यांची कॅबिनेटची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती. भाजप सरकारची जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबवली.

2019 मध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर आ. शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यातच आता शिवसेना व भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातून संभाव्य मंत्र्यांच्या यादीतही आ. शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.त्यासोबत नगरचे पालकमंत्रीपदही आ.शिंदेंना संधी मिळणार असल्याची चर्चा जिल्हाभर होत असताना आता भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आ. शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.

Team Global News Marathi: